ज्यांनी महिला, सामान्यांचे रक्षण करून कायदा सुवव्यवस्था राखायची असते, अशांनीच घात केल्याचा आरोप होऊ लागला आहे. रक्षकच भक्षक बनल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार कर्जत येथे उघडकीस आला आहे.
कर्जत जकात नाका येथील रेल्वे स्टेशनच्या पुलावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलिसासह त्याच्या साथीदारावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी खुद्द पोलीस कर्मचारी असल्याने तक्रार नोंदवण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी मध्यरात्री थेट पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. अखेर ग्रामस्थांच्या तीव्र रोष आणि दबावानंतर पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९:३० वाजेच्या सुमारास तक्रारदार महिला आपल्या बहिणीसोबत कर्जत बाजारातून गुंडगे येथील आपल्या घरी परतत होत्या. कर्जत जकात नाक्याजवळील रेल्वे पुलावरून जात असताना मागून आलेल्या दोन मद्यधुंद इसमांनी त्यांचा पाठलाग केला. त्यातील एकाने “चल येते का चल” असे म्हणत महिलेची निर्लज्जपणे छेड काढली.
घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीने तातडीने तेथे धाव घेत विचारणा केली असता, छेडछाड करणारा इसम हा पोलीस कर्मचारी प्रमोद मारोती पाटील (रा. भिसेगाव) आणि त्याचा साथीदार महेंद्र भगवान भंडारे (रा. गुंडगे) असल्याचे उघड झाले. या घटनेचा व्हिडिओ महिलेच्या बहिणीने मोबाईलमध्ये कैद केला असता, आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
पोलीस ठाण्यात ग्रामस्थांचा ठिय्या अन् परस्परविरोधी गुन्हे दाखल
घटनेनंतर पीडित महिला आणि तिचे नातेवाईक तक्रार देण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले. परंतु, आरोपी हा डीवायएसपी (DySP) यांच्या ताफ्यातील पोलीस कर्मचारी असल्याने सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप झाला. घटनेची माहिती पसरताच २० ते ३० गावकरी पोलीस ठाण्यात जमा झाले आणि त्यांनी कारवाईसाठी पोलिसांवर दबाव आणला.
अखेर ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी प्रमोद मारोती पाटील आणि महेंद्र भंडारे यांच्याविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३’ च्या कलम ७५(३), ७८ आणि ७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत. दुसरीकडे, आरोपी महेंद्र भंडारे याला पीडित महिलेच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचा परस्परविरोधी गुन्हाही पहाटे दाखल करण्यात आला आहे.




