समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पक्षाचे नेते आणि राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य इद्रीस नाईकवडी यांनी मंगळवारी केली आहे. हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याशी संबंधित विधेयक सादर केले जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आपण गेल्या आठवड्यात पक्षाध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहिल्याचे नाईकवडी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. आपला पक्ष एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मी पत्राद्वारे केली आहे, असे ते म्हणाले.

इद्रीस नाईकवडी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन मुस्लिम आमदारांपैकी एक आहेत. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने या मुद्द्यावर अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
राज्य सरकारकडून समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करणारी समिती आपला अहवाल सादर केल्यानंतर, राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली होती. तर भाजपच्या नेतृत्वाखालील २१ राज्यांमधील सरकारे २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू करतील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केली होती.





