
महापालिका क्षेत्रातील शैक्षणिक संस्था, रूग्णालये व न्यायालय अशी २५ ठिकाणी शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली असून या ठिकाणच्या १०० मीटर परिसरात ध्वनी प्रदुषण राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
सांगली महानगरपालिका हद्दीतील शैक्षणिक संस्था, रुग्णालये व न्यायालये परिसरातील २५ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून वर्गीकृत करण्यात आलेली आहेत. यामध्ये सांगलीतील भारती विद्यापीठ, सिटी हायस्कूल, बापट बाल शिक्षण मंदिर, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, आठवले विनय मंदिर, पटवर्धन हायस्कूल, पुरोहित कन्या प्रशाला, श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, विलिंग्डन महाविद्यालय, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, भारती हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय या स्थळांचा समावेश आहे.
तर मिरज शहरातील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, ज्युबिली कन्या प्रशाला, मिरज हायस्कूल, विद्यामंदिर प्रशाला, भारत भूषण हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, दिवाणी न्यायालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वानलेस हॉस्पिटल, कृपामयी मानसोपचार रुग्णालय आणि रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल या ठिकाणांचा समावेश आहे.
जाहीर करण्यात आलेल्या शांतता क्षेत्रामध्ये संबंधित शैक्षणिक संस्था, रुग्णालय किंवा न्यायालयाच्या सभोवतालचा १०० मीटर परिसर विचारात घेतला जातो. ध्वनीप्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषत। रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांचा विचार करून या परिसरात अनावश्यक ध्वनी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शांतता क्षेत्राच्या हद्दीत अनावश्यक हॉर्न, मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक, ध्वनी वर्धक, मोठ्या आवाजातील संगीत किंवा अन्य ध्वनी निर्माण करणार्या साधनांचा वापर टाळावा.शांतता क्षेत्रामध्ये दिवसा ५० तर रात्री ४० डेसिबल ध्वनी मर्यादा आहे. उत्सव साजरा करताना रुग्णालयातील रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच न्यायालयीन कामकाजासाठी येणारे नागरिक यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




