मंत्रालयात ओळख असून नोकरी लावतो म्हणत घातला ६ लाखाचा गंडा; पोलीसांनी ठोकल्या बेड्या

 

सातारा प्रतिनिधी | मंत्रालयात आपली ओळख आहे. तेथील ओळखीने आरोग्य विभागामध्ये नर्स म्हणून नोकरी लावतो, असे महिलेला सांगून फसवणूक केल्याप्रकरणी राजेश उर्फ पप्पू नंदकुमार शिंदे (वय 35, रा.बोरगाव ता. सातारा) या भामट्याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी, पप्पू शिंदे याने 2023 मध्ये संबंधित तक्रारदार महिलेशी ओळख निर्माण केली. महिलेला नोकरीची गरज असल्याचे पाहून त्याने मंत्रालयात त्याची ओळख आहे, असे सांगितले. अशाच पध्दतीने आणखी एकालाही नोकरीचे आमिष दाखवले. यासाठी पप्पू याने दोघांकडून वेळोवेळी एकूण 6 लाख 20 हजार रुपये घेतले. मात्र संशयिताने कोणतीही नोकरी न देता व घेतलेले पैसे माघारी देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) तपासाला सुरुवात केल्यानंतर संशयित पसार झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर संशयिताची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर भामट्यावर यापूर्वी देखील अशाच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने वेळोवेळी ऑनलाईन व रोख स्वरूपात पैसे घेतले असल्याचे सांगितले. तसेच त्याची कोठेही मंत्रालयात व आरोग्य विभागामध्ये ओळख नसल्याचे सांगितले.

पोनि राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शामराव काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस निलेश यादव, महेंद्र पाटोळे, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Comment

WhatsApp Icon Telegram Icon