Mantralaya Times : मंत्रालयातील ‘या’ नंबरचे ‘शापित दालन’ बहुचर्चेत..! प्रत्येक मंत्री इथे बसायला नको म्हणतोय…वाचा सविस्तर..!
-
खास प्रतिनिधी
आपल्याकडे राजकारण आणि अंधश्रद्धा यांचे खूप जुनं नातं आहे. अशीच एक अंधश्रद्धा मंत्रालयातील (Mantralaya) एका दालनाबाबत आहे. या दालनाबाबत अनेकदा चर्चा होताना दिसते. असं मानलं जातं की या दालनात (Mantralaya) बसणारा मंत्री त्याला एक तर त्याची खुर्ची गमवावी लागते किंवा त्याचा मृत्यू होतो.आता देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार सुरू झालाय त्यामुळे पुन्हा एकदा हे दालन चर्चेत आले.आपण ज्या दालनाबाबत बोलत आहोत हे दालन आहे मंत्रालयातील 6 व्या मजल्यावरील 602 नंबरचे दालन.
मंत्रालयातलं सहाव्या मजल्यावरच 602 नंबरच हे दालन सगळ्यात मोठे दालन आहे. त्यामुळे वरिष्ठ मंत्री जे असतात त्यांना हे दालन देण्यात येते. पण आता परिस्थिती अशी आहे की हे दालन घेण्यासाठी कोणताही मंत्री हा अजिबात इच्छुक नसतो. त्यामुळे हे दालन गेल्या पाच वर्षापासून रिकामेच आहे. म्हणजे इथे कुठलाही मंत्री बसलेला नाही.
आता महायुतीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना 602 नंबरच दालन देण्यात आले आहे. ते भाजपचे आमदार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. खरं म्हणजे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं तेव्हा त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झाला पण जेव्हा त्यांना 602 नंबरच दालन देण्यात आलं तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये काहीसे भीतीच वातावरण किंवा कुजबूज सुरू झाली.
छत्रपती शिवाजी महाराज हे अजिबात अंधश्रद्धा वगैरे मानायचे नाही. त्यांच्या अनेक मोहिमा या अमावस्येच्या रात्री पार पडल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असूनही या दालनाचा पूर्व इतिहास बघता शिवेंद्रराजे भोसले सुद्धा काहीसे विचारात पडले त्यामुळे सध्या ते या दालनात बसत नाही तर त्याच्या बाजूला जे दालन आहे तिथे बसून ते आपला कारभार पाहत आहेत.
602 नंबरच दालन पाहिलं तर अतिशय मोठं आणि प्रशस्त आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळा हॉल आहे. त्याचबरोबर दोन केबिन आहेत पण तरीही हे दालन घेण्याची वेळ येते तेव्हा मंत्र्यांकडून नकार घंटा वाजवली जाते. कारण याचा पूर्व इतिहासाच तसा आहे. म्हणजे मंत्र्यांमध्ये अशी चर्चा आहे की या दालनात (Mantralaya) बसणारा व्यक्ती एकतर त्याचा कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही. किंवा त्याला त्याची खुर्ची गमवावी लागते किंवा त्याचा पराभव होतो. नाहीतर मग त्याचा मृत्यू होतो. आता असे का म्हंटले जाते ते जाणून घेऊया…
1999 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यावेळेस छगन भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांना 602 नंबरच दालन देण्यात आलं होतं. तेव्हा तेलगी घोटाळा प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं. या पेपर घोटाळ्यामुळे छगन भुजबळ यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर पुन्हा एकदा आघाडीचे सरकार आलं आणि त्यावेळेस अजित पवार यांना हे दालन देण्यात आलं. यानंतर सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचं नाव आलं आणि आघाडी सरकार पाडण्यात या सिंचन घोटाळ्याची महत्त्वाची भूमिका ठरली.
2014 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आलं. त्यावेळेस एकनाथ खडसे यांना जेष्ठ मंत्री या नात्याने हे दालन देण्यात आलं. त्यावेळेस जमीन खरेदी प्रकरणात ते अडकले त्यांच्यावर आरोप झाले आणि त्यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पांडुरंग फुंडकर हे या दालनात होते आणि काही काळाने हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. मग 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अनिल बोंडे यांना हे दालन देण्यात आलं पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला एकूणच अशी या दालनाची कारकीर्द राहिली आहे. त्यामुळे मंत्र्यांमध्ये हे दालन घ्यायची वेळ येते तेव्हा नको रे बाबा असाच सूर पाहायला मिळतो.
देशाच्या राजकारणात अशा विविध प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा गैरसमजुती प्रचलित आहेत. म्हणजे असं म्हटलं जायचं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा त्याचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ला जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा पूर्ण करून दाखवला. त्याचबरोबर सागर बंगला हा सुद्धा अशुभ मानला जायचा या बंगल्यात कोणी राहत नव्हतं पण देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदाची जेव्हा जबाबदारी मिळाली तेव्हा हा बंगला देण्यात आला आणि हा जो गैरसमज होता तो सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मोडून काढला.
अजून एक गैरसमज होता की ज्या नेत्याच्या नावात इंग्रजी स्पेलिंग मध्ये आर नाही तो कधी पंतप्रधान होऊ शकत नाही पण डॉ. मनमोहन सिंग यांनी हा समज खोडून काढला. आता उत्तर प्रदेशच्या बाबतीत सुद्धा असा एक गैरसमज आहे की उत्तर प्रदेशचा जो मुख्यमंत्री नोएडात जातो तो पुन्हा कधी मुख्यमंत्री होतच नाही पण योगी आदित्यनाथ यांनी हा समाज खोडून काढला.
खरं म्हणजे श्रद्धा – अंधश्रद्धा हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे पण त्यावर किती विश्वास ठेवायचा हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं असे अनेक समज असतात की त्याला कोणतेही शास्त्रीय आधार नसतात. राजकारणात तुमचं काम बोलतं म्हणजे तुम्ही घोटाळे केले तुम्ही भ्रष्टाचार केले तर तुम्हाला तुमचं पद सोडावं लागणारच आहे किंवा लोक तुमच्यावर बोट उचलणारच त्यासाठी एखादं दालन किंवा एखादा बंगला याचा संबंध आपण जोडू शकत नाही पण तरीही अशा निरर्थक चर्चा या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून रंगत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्या बाबतचा समज खोडून काढला तशी संधी आता शिवेंद्रराजे भोसले यांना आहे. त्यांनी सुद्धा या दालनात बसून असं काम करून दाखवावं की हा जो समज आहे तो मोडून निघेल. त्यामुळे मंत्रालयातील (Mantralaya) 602 या दालना बाबत जी काही अंधश्रद्धा किंवा ज्या काही गैरसमजुती पसरल्यात त्या कोणता मंत्री आता खोडून काढतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.