सातारा

कामगारमंत्री डॉ. खाडेंच्या उपस्थितीत बांधकाम कामगार संमेलन उत्साहात

 

मंत्रालय टाइम्स – सातारा प्रतिनिधी | राज्याच्या विकासात सर्वस्तरातील कामगारांचे मोठे योगदान आहे. या कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना बळकटी मिळवून देण्यासाठी महायुती शासन खंबीर असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांनी केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजारावरुन ३ हजार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपा कामगार मोर्चा कराड दक्षिणच्यावतीने शिंदेवाडी-विंग येथील समर्थ मल्टीपर्पज हॉलमध्ये भव्य बांधकाम कामगार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात ना. खाडे यांच्या हस्ते कराड दक्षिणमधील सुमारे २,४९२ लाभार्थी बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना भांडी वाटप व बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना ना. खाडे पुढे म्हणाले, महायुतीचे शासन सर्वस्तरातील लोकांसाठी विविध योजना राबवित आहे. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक लाभ मिळवून दिले जात आहेत. याचा लाभ कामगारांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा.

कामगारांची नोंदणी सुलभतेने होण्यासाठी तालुकास्तरावर विशेष सेतू केंद्र सुरु करण्यात येत आहेत. बांधकाम कामगारांबरोबरच सन्मानधन योजनेअंतर्गत वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत पात्र घरेलू कामगारांच्या बँक खात्यात थेट १० हजार रुपये जमा केले जात आहेत.

घरेलू कामगारांनाही गृहोपयोगी वस्तू संच देऊन, त्यांना मायेची ऊब देण्याचा महायुती शासनाचा प्रयत्न आहे. घरेलू कामगारांना देण्यात येणाऱ्या लाभासाठी शासनाने मोठी तरतूद केली आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजारावरुन तीन हजार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यामध्ये सर्वाधिक बांधकाम कामगारांची नोंद झालेली आहे. अधिकाधिक पात्र लाभार्थींना याचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महायुती शासन प्रयत्नशील असून, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन लोकांना याबाबतची माहिती देत आहोत. तसेच त्यांच्यासाठी विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे.

यावेळी जिल्ह्याचे कामगार आयुक्त रेवणसिद्ध भिसले, कामगार आयुक्त नितीन पाटणकर, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे, सौ. शामबाला घोडके, समृद्धी जाधव, भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दादाभाऊ उमराणी, तालुकाध्यक्ष रुपेश देसाई, योगेश पाटील, सागर पाटील, विकास साळुंखे यांच्यासह बांधकाम कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!