पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना धरण येथे जलपूजन.
मंत्रालय टाइम्स – सातारा | कोयना धरणात शंभर टी.एम.सी. पेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. या धरणातील जलाशयाचे पूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
कोयना धरणस्थळी झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, तहसीलदार अनंत गुरव,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता निलेश पोदार, सहाय्यक अभियंता सागर पाटील, आशिष जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी कोयना धरणातील जलाचे विधिवत पूजन करून ओटीभरण केले. यावेळी ते म्हणाले, कोयना धरण हे महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या भरभराटीमध्ये संपन्नतेमध्ये या धरणाचा फार मोलाचा वाटा आहे. सध्या धरण शंभर टीएमसीच्यावर भरले आहे. यामुळे सिंचनासह विद्युत निर्मितीचा प्रश्न मिटला आहे. सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात याचा लाभ होणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.