सोलापूर (खास प्रतिनिधी ) – मंत्रालय टाइम्स | राज्यातील जात पडताळणी समित्यांकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी (कास्ट व्हॅलिडिटी) दरमहा पाच हजारांहून अधिक अर्ज येतात. त्यात राजकीय, सरकारी नोकरदार, व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आहेत.
त्यांना किमान १५ ते ४० दिवसांत व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे, पण सध्या राज्यातील ३६ समित्यांसाठी अवघे चार अध्यक्ष असल्याने प्रमाणपत्रासाठी विलंब लागतोय. सोलापूर जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष रविराज फल्ले यांच्याकडे तर तब्बल १० जिल्ह्यातील समित्यांचा पदभार आहे.
इयत्ता दहावीनंतर अकरावी, बारावीसाठी विज्ञान शाखेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी व व्यावसायिक शाखांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक असते. याशिवाय सरकारी नोकरदार आणि राजकीय व्यक्तींनाही वेळेत कास्ट व्हॅलिडिटी लागते. अजूनही राज्यातील समित्यांकडे जवळपास १० हजारांपर्यंत अर्ज प्रलंबित असून त्यातील बहुतांश प्रमाणपत्र अध्यक्षांच्या स्वाक्षरीविना पडून असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाच दिवसांचा आठवडा असल्याने त्या अध्यक्षांना दहा-दहा जिल्ह्यांमध्ये जाऊन कामकाज करणे अशक्य असल्याची वस्तुस्थिती आहे. सोलापूर जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र समितीचा पदभार मुंबई उपनगर समितीचे अध्यक्ष रविराज फल्ले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पण, ते अजूनही सोलापुरात आलेले नाहीत, हे विशेष.
आठवडा पाच दिवसांचा अन् अध्यक्षांकडे पदभार १० जिल्ह्यांचा
राज्य सरकारच्या शासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सध्या पाच दिवसांचा आठवडा (कामाचे दिवस) आहे. तरीदेखील सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष रविराज फल्ले यांच्याकडे मुंबई उपनगरासह मुंबई शहर, सोलापूर, पालघर, सातारा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग या १० जिल्ह्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापैकी बहुतेक जिल्ह्यांमधील अंतर खूप असून ते पार करायलाच अख्खा दिवस प्रवासातच जातो. त्यामुळे आठवड्यातील ५ दिवसांत १० जिल्ह्यांचा प्रवास अशक्य असल्याने सोलापूरचा पदभार सोपविल्यापासून नवे अध्यक्ष श्री. फल्ले एकदाही सोलापुरात आलेले नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे.
‘सिलेक्शन ग्रेड’च्या पदोन्नतीचा प्रस्ताव पडून
अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या सिलेक्शन ग्रेड पदोन्नतीचा प्रस्ताव महसूल खात्याकडे यापूर्वीचा प्रलंबित आहे. पण, त्यावर मागील काही महिन्यांपासून निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील जात पडताळणी समित्यांना पूर्णवेळ अध्यक्षच मिळत नसल्याची स्थिती मागील दोन वर्षांपासून पाहायला मिळत आहे. नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्या पदोन्नतीच्या फाईलवर तातडीने निर्णय घेतील का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
नूतन अध्यक्ष लवकरच घेतील आढावा
सोलापूर जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून रविराज फल्ले यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे दहा समित्यांचा पदभार असल्याने पुढच्याा काही दिवसांत ते सोलापूर समितीच्या कामकाजाचा आढावा घेतील, अशी अपेक्षा आहे.
– सचिन कवले, सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर




