मुंबई शहरअमरावती विभागकोकण विभागछ . संभाजीनगरनागपूर विभागनाशिक विभागपश्चिम महाराष्ट्रसोलापूर

मोठी बातमी! १३ ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता? महायुती सरकारची आज शेवटची ‘कॅबिनेट’; निवडणुकीचा ‘असा’ असणार ४४ दिवसांचा प्रोग्राम, वाचा सविस्तर

मंत्रालय टाइम्स – मुंबई प्रतिनिधी | विधानसभेची निवडणूक वेळेत होवून २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होण्याकरिता १३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. ८) कॅबिनेट बोलावण्यात आली असून महायुती सरकारची चालू कार्यकाळातील ही शेवटची कॅबिनेट ठरू शकते, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील (सीएमओ) विश्वसनिय सूत्रांनी माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. ७) सोलापूर दौऱ्यावर होते आणि मंगळवारी सोलापुरात वनचपूर्ती सोहळा होणार असतानाही ते बैठकीसाठी पुन्हा मुंबईला परतले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंगळवारी (ता. ८) सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता वचनपूर्ती सोहळा होणार आहे.

कॅबिनेटची बैठक दुपारी चारनंतर होणार असल्याचे मंत्रालयातील विश्वसनिय सूत्रांनी ‘मंत्रालय टाइम्स ‘ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. दरम्यान, मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या सलग दोन दिवस बैठका पार पडल्या असून आता आज पुन्हा कॅबिनेट बोलावण्यात आली आहे.

या बैठकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील विविध विभागांमध्ये सोमवारी दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या असून या कॅबिनेटमध्ये १०० हून अधिक विषय ठेवले जाणार आहेत.

दरम्यान, या कॅबिनेटमध्ये आणखी कोणत्या योजनांची घोषणा होणार, कोणत्या घटकांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १३ ऑक्टोबरला आचारसंहिता जाहीर झाल्यास बरोबर दिवाळीनंतर मतदान होईल आणि २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार सत्तेत येवू शकेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सागितले. या पार्श्वभूमीवर सध्या मंत्रालयातील हालचाली गतिमान झाल्याचे चित्र आहे.

निवडणुकीसाठी साधारणत: लागतात ३५ दिवस

राज्याचे नवीन सरकार २६ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण तयारी झाली असून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून निकालापर्यंत साधारणपणे ३० ते ३५ दिवस लागतात.
– गणेश निर्‍हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

निवडणूक ते सत्ता स्थापनेपर्यंत लागतातच इतके दिवस

आचारसंहितेनंतर तयारी : ५ ते ६ दिवस
उमेदवारी अर्ज भरणे : ७ दिवस
छाननी व अंतिम यादी : १ दिवस
अर्ज माघार : २ दिवस
प्रचारासाठी दिवस : १२ ते १५ दिवस
मतदान व निकाल : ३ ते ४ दिवस
सरकार स्थापनेसाठी अवधी : १० ते १२ दिवस

  • मंत्रालयातील अधिकारी म्हणाले…

पुढील आठवड्यात विधानसभा आचारसंहितेची शक्यता असल्याने १३ तारखेपूर्वी सर्व प्रलंबित विषयांवर निर्णय घेण्याच्या दृष्टीने आज (मंगळवारी) दुपारी चारनंतर कॅबिनेट बोलावण्यात आली आहे. यावेळी विषयांची संख्या भरपूर असल्याने तेवढे विषय या बैठकीत न झाल्यास बुधवारी किंवा गुरुवारी पुन्हा एक कॅबिनेट होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!