‘गोकुळ’ची कोरमअभावी तहकूब झालेली अध्यक्षपदाच्या निवडसभेची कोंडी पंधरा दिवसांनी फुटली असून आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सभा होत आहे. या निवडणुकीकडे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष होणार की समविचारी आघाडी बाजी मारणार, याचा फैसला होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
आजच्या निवडणुकीत महायुती आपला उमेदवार निवडून आणणार की समविचारी आघाडी सत्तेवर येणार, याची उत्सुकता आहे. या सभेपूर्वीच राज्य सरकारने ४ संचालक नेमून त्यांना मताचा अधिकार देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्यपालांनीही तसा वटहुकूम जारी केला आहे. या अध्यादेशाला खंडपीठात आव्हान देऊन त्याला स्थगिती देण्याची विनंती याचिकेत केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उद्याच्या सभेसाठी २५ संचालकांनाच नोटीस पाठवण्यात आली आहे.
📌 ६०० पोलीस तैनात, शिरगावात तणावपूर्ण शांतता
आजच्या अध्यक्ष निवडीवेळी महायुती, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता असल्याने ६०० पोलिस या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. यामध्ये १०० जणांचा समावेश असलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानांचाही समावेश राहणार आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही गटांचे कार्यकर्ते गोकुळ शिरगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. सकाळपासूनच गोकुळ शिरगाव परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.
📌 गोकुळमध्ये ४ संचालकांचे मतदान होणार वेगळ्या पेटीत
📌 या सभेला तरी महायुतीचे संचालक उपस्थित राहणार का?
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून शशिकांत पाटील-चुयेकर, तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह पाटील किंवा माजी आमदार राजेश पाटील यांच्यात लढत होणार आहे. शासन नियुक्त चार सदस्य या सभेत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
‘गोकुळ’च्या निवडणुकीनंतर २९ ऑक्टोबरला अध्यक्ष निवडीची सभा झाली. पण, महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिल्याने ही सभा तहकूब झाली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी ही सभा घेण्याचे आदेश दीपावली पाडव्या दिवशी ही सभा होत असून या सभेला तरी महायुतीचे संचालक उपस्थित राहणार का? या विषयी उत्सुकता होती. शासनाने विविध क्षेत्रातील चारजणांची शासकीय प्रतिनिधी नियुक्ती करत त्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने महायुतीचे संचालक आता सभेला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, शासन नियुक्त चार संचालकांना सभेला उपस्थित राहण्यासाठी सोमवारी सायंकाळपर्यंत नोटिसा लागू केल्या नव्हत्या. पण, निवडून आलेल्या संचालकांना किमान सात दिवस अगोदर नोटीस पाठवणे कायद्याने बंधनकारक असून शासन नियुक्त संचालक शॉर्ट नोटीसवर सभेला उपस्थित राहू शकतात, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. महायुतीचे संचालक रात्री उशिरा कोल्हापुरात गेले आठ दिवस परराज्यात सहलीवर गेलेले महायुतीचे १२ संचालक आजच्या निवडसभेला उपस्थित राहण्यासाठी रात्री उशिरा कोल्हापुरात दाखल झाले.



