आशिष जयगोंड विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; भारतीय न्याय संहितेसह शस्त्र अधिनियमान्वये कारवाई.!
मिरज शहरातील शेतकरी चौक परिसरात घराच्या अंगणात पाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ४९ वर्षीय व्यक्तीची कोयत्याने वार करून हत्या केल्याची गंभीर घटना मिरजेत घडली आहे. इलाही लालसाब शेख (वय ४९, रा. डोणगे गल्ली, मिरज) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आशिष बसवराज जयगोंड याच्याविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास मृत इलाही शेख हे घराच्या अंगणात पाणी मारत होते. यावेळी पाणी आरोपीच्या घराच्या अंगणात उडाल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. याचाच राग मनात धरून आरोपी आशिष जयगोंड याने इलाही शेख घरी परतत असताना त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी मृताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४ व २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद १० नोव्हेंबर रोजी रात्री ७.५३ वाजता करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक संजय नारायण पाटील यांच्या नोंदीखाली प्रकरणाची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्याकडे देण्यात आल्याचे पोलीस दैनंदिनीत नमूद आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याने मिरज शहरात खळबळ उडाली आहे.



