महायुतीत मिठाचा खडा..? तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, अजित पवार गटाचा इशारा..!
मंत्रालय टाइम्स – सोलापूर | “राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात”, वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं.
दरम्यान, तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) आक्रमक झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आलाय.
तानाजी सावंताच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार पलटवार केलाय. तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे. आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, महायुतीत राष्ट्रवादी ही तानाजी सावंत यांच्यामुळे नाहीये. उलट महायुती झाली म्हणून आज तानाजी सावंत हे मंत्री झालेत. पण अशा पद्धतीने ते बोलणार असतील तर पक्षनेतृत्वाकडे विनंती करतो की आपण यातून बाहेर पडलेले बरे, असंही उमेश पाटील म्हणाले.
- तानाजी सावंत काय काय म्हणाले होते?
मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही. हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही, असंही तानाजी सावंत म्हणाले होते.
- तानाजी सावंतांचा इलाज मुख्यमंत्री शिंदेंनी करावा
तानाजी सावंत राष्ट्रवादीबाबत आक्रमक वक्तव्य केल्यानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, तानाजी सावंतांना उलट्या कशामुळे होतात हे माहिती नाही. तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत, आरोग्याचा काही संबंध असेल. मात्र महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील.