विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत येणार..!
मंत्रालय टाइम्स – मुंबई | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त मंगळवार, ३ सप्टेंबर २०२४ रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांतील सन २०१९ ते २०२४ या कालावधीतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारप्राप्त सदस्यांना त्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.
- विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्षांनी दिली माहिती
विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यासंबंधी माहिती दिली की, महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांतील सन २०१९ ते २०२४ या कालावधीतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारप्राप्त सदस्यांना मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त होणाऱ्या या विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ या ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे.
- १९९५ पासून दिले जातात ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा ही देशातील राज्य विधानमंडळांमध्ये स्थापन झालेली (सन १९५२) सर्वात पहिली शाखा आहे. संसदीय लोकशाहीच्या संदर्भात सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रम राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सातत्याने राबविण्यात येतात. सन १९९५ पासून दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना प्रत्येक वर्षासाठी “उत्कृष्ट संसदपटू” आणि “उत्कृष्ट भाषण” पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कारप्राप्त सदस्यांना दि. ३ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या समारंभात गौरविण्यात येईल.
या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.महाराष्ट्र विधानमंडळाच्या गौरवशाली परंपरेतील या संस्मरणीय आणि ऐतिहासिक सोहळ्यासाठी दोन्ही सभागृहांचे विद्यमान सदस्य, विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्रातील संसद सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही पीठासीन अधिकारी यांनी केले.
- उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी घेतली कार्यक्रमाच्या पूर्व तयारीबाबत आढावा बैठक
कार्यक्रमस्थळी बैठक व्यवस्था, विधान भवन परिसरातील स्वच्छता, निवास, स्वागत, वैद्यकीय पथक, सुरक्षा पासेस, वाहन पार्किंग, प्रसिद्धी व्यवस्था आदींचे नियोजन विभागांकडून जाणून घेतले. विधान भवन परिसरात सर्व आरोग्य सुविधांनी युक्त रुग्णवाहिका, मोबाईल टॉयलेट्स ची व्यवस्था करण्यात यावी, तसेच प्रत्येक पथकाने आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पडण्याच्या सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केल्या. पाऊस आणि ऊन यांच्या बचावासाठी विधान भवन प्रवेशद्वाराजवळ उपाययोजना करण्यात यावी. कार्यक्रम योग्य प्रकारे पार पडण्यासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.