खास प्रतिनिधी | मंत्रालय टाईम्स
सांगली जिल्ह्यातील पलूस येथील दाम्पत्याने विष प्राशन केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने या दाम्पत्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मनीषा संजय पाटील (वय ४२) आणि संजय तात्यासो पाटील (वय ४६) अशी मृतांची नावे आहेत. पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच कर्जाच्या तगाद्यामुळे त्यांनी विषप्राशन केल्याची तालुक्यात चर्चा आहे. मात्र कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
📌 नवरा-बायकोला डिस्चार्ज दिला होता
संजय पाटील आणि मनीषा पाटील यांनी २ सप्टेंबर रोजी विष प्राशन केले होते. सुरुवातीला त्यांना ग्रामीण रुग्णालय, पलूस आणि त्यानंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी ५ सप्टेंबर रोजी दुपारी दोघांना डिस्चार्ज दिला होता.
मात्र, रविवारी ६ सप्टेंबर सकाळी घरी असताना दोघांनाही पुन्हा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने आधी पलूस ग्रामीण रुग्णालय आणि तिथून पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
सकाळी ११ वाजता रुग्णालयात आणल्यानंतर तपासणीअंती डॉक्टरांनी मनीषा पाटील यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तर संजय पाटील यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचाही मृत्यू झाला.
एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. याप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.



