डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपद(पश्चिम उपनगरे), जोशी यांच्याकडून काढला परवाना विभागाचा भार..!
मंत्रालय टाइम्स – विशेष प्रतिनिधी, मुंबई | अतिरिक्त आयुक्तपदी असलेल्या डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली झाल्यांनतर अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) या पदाचा भार तीन अतिरिक्त आयुक्तांवर विभागून सोपवण्यात आला होता.
परंतु या रिक्त जागी डॉ. विपिन शर्मा यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याकडे पश्चिम उपनगरेचा पदभार सोपवण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य खाते, मध्यवर्ती खरेदी खाते, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मालमत्ता खाते, नियोजन विभाग हे डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे दिल्यामुळे मागील दहा ते बारा दिवसांमध्ये अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागासंदर्भात आढावा बैठक घेऊन दिलेल्या निर्देशांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, विपिन शर्मा यांच्याकडे पश्चिम उपनगरांचा पदभार सोपवताना डॉ. अश्विनी जोशी यांच्याकडे काही महत्वाच्या खात्यांची तथा विभागांची जबाबदारी सोपवली जाईल अशी शक्यता होती. परंतु जोशी यांच्याकडून परवाना विभागाचा भार काढून एकप्रकारे फेरीवाल्यांवर सुरु असलेल्या कारवाईला शिथिलता देण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असल्याचे स्पष्ट होत आहे. (BMC)
मुंबई महापालिकेत तब्बल ३१ दिवसांनंतर अतिरिक्त आयुक्तांचे पद भरण्यात आले असून शनिवारी या पदाचा भार डॉ. विपिन शर्मा यांनी स्वीकारल्यानंतर सोमवारी त्यांच्याकडे पश्चिम उपनगरेचा पदभार सोपवण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्याकडे अनुज्ञापन विभाग व दुकाने आणि आस्थापने विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, या विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्याकडे आहे, तर पश्चिम उपनगरे अंतर्गत येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीनंतर आपत्कालिन व्यवस्थापन विभागाची कमान जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली हाती, त्यामुळे या पदाचा भार जोशी यांच्याकडे राहील अशी शक्यता होती. परंतु हा पदाचा भार डॉ. अमित सैनी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. (BMC)
- याद्वारे फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक शिथिल करण्याचा प्रयत्न
दरम्यान, फेरीवाल्यांवरील कारवाई डॉ. जोशी यांनी स्वत: पुढाकार घेत तीव्र करण्यास भाग पाडली होती, त्यामुळे फेरीवाल्यांमध्ये एकप्रकारे जोशी यांच्याबाबत तीव्र कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या बोलण्यास कोणताही अधिकारी हिंमत करत नसल्याने कुणाचेही काही चालत नव्हते. त्यामुळे जोशी यांच्याकडील परवाना विभाग आणि दुकाने वआस्थापने विभाग डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे सोपवून फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक शिथिल करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. (BMC)
तर आरोग्य विभागाची जबाबदारी ही यापूर्वी जोशी यांच्याकडे जाईल अशाप्रकारची चर्चा होती, परंतु प्रत्यक्षात पदाचा विभागणी करताना या पदाचा भार अभिजित बांगर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या पदाचा तात्पुरता भार असतानाही बांगर यांनी सर्व आरोग्य विभागाची आढावा बैठक घेऊन रुग्ण आणि डॉक्टर यांमधील सलोख्याच्या संबंधाबाबत निर्देश दिले होते. तसेच झिरो प्रिक्रिप्शनबाबत औषध खरेदी तातडीने करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली यंत्रणेची अंमलबजावणी करा अशाप्रकारचे निर्देश दिले होते. त्यामुळे बांगर यांनी हे निर्देश दिल्यांनतर आता या पदाचा भार विपिन शर्मा यांच्याकडे आल्याने आता आरोग्य विभागाला यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)