मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली नावांची यादी गेली दिल्लीकडे ; उद्या नागपुरात पार पडणार शपथविधी सोहळा
- मंत्रालय टाइम्स (खास प्रतिनिधी )
महायुतीच्या मंत्रिमंडळाचा उद्या नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
दरम्यान, 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्या दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.
अशातच महायुतीच्या मंत्रिमंडळाची यादी संदर्भात महत्वाची माहीती समोर आली आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली नावांची यादी आता दिल्लीकडे पाठवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता केवळ औपचारिकता असली तरी दुपारपर्यंत या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित यादी दिल्लीत पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुपारनंतर मंत्रिपदावर वर्णी लागणाऱ्यांना संपर्क सुरु होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या नागपुरातील राजभवनात पार पडणार आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रीपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षात मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून काही मंत्रीपद रिक्त ठेवले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
- मुख्यमंत्री करणार भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना करणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतरच मंत्रिपदांवर शिक्कामोर्तब होईल. याचदरम्यान, भाजपच्या संभाव्य मंत्र्याची यादी समोर आली आहे.