अजित पवार 30 तासांपासून नॉट रिचेबल:अधिवेशनाला गैरहजर असलेले ‘अजितदादा’ नागपूरच्या बंगल्यावरही नसल्याची माहिती
- खास प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या ‘नॉट रिचेबल’ होण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. हिवाळी अधिवेशनानाचा आज दुसरा दिवस आहे. सत्ताधाऱ्यांच्या चहापानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार कुणालाही भेटले नसल्याचे माहिती समोर येत आहे.
दरम्यान अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. भुजबळांसह त्यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांचा रोख अजित पवार यांच्याकडे असल्याचे बोलले जात असून त्यामुळेच अजित पवार अधिवेशाला हजर नसल्याची चर्चा आहे.
- अन्यथा बारामतीत उद्रेक करू-
ओबीसी नेते अजित पवारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अन्यथा बारामतीत उद्रेक करू असा इशारा ओबीसी समाजाने दिला आहे. त्यांच्यामार्फत अजित पवारांच्या बारामतीमधील घराबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. यातच 22 तारखेला अजित पवारांचा नागरी सत्कार बारामतीमध्ये होणार आहे.
- मंत्रिपदाचा नाही अवहेलनेचा प्रश्न
छगन भुजबळ म्हणाले की, मंत्रिपद कुणी नाकारले हे शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि कुणीही नाकारले तरी शेवटी पक्ष प्रमुखाचा निर्णय महत्त्वाचा असतो. भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात. शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. आणि बाकीचे काही असले तरी आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत. ते त्यांचा निर्णय घेत असतात. प्रत्येकालाच मंत्रिपद हवे असते. पण यासंबंधी प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे. यासंबंधी मी उद्या तुम्हाला आणखी काही सांगेन, असे भुजबळ म्हणाले.
- जनतेशी संवाद साधणार
छगन भुजबळ म्हणाले की, माझी माझ्या सहकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात त्यांनी आपले दुःख व उद्विग्नता व्यक्त केली. मी सुद्धा त्यांना मागील 5-6 महिन्यांपासून म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून जे काही घडले त्याची माहिती दिली. आता आम्ही मतदारसंघात जाऊन तेथील जनतेशी संवाद साधू. त्यानंतर महाराष्ट्रातील आमच्या कार्यकर्ते, ओबीसी व समता परिषदेच्या लोकांचा विचार जाणून घेऊ.
- शब्द जपून वापरावेत
छगन भुजबळ म्हणाले की, पण सर्वांच्या मनात राग आहे, निराशा आहे. मी सर्वांना असंस्कृतपणे काही बोलू नये अशी विनंती केली आहे. शिवीगाळ किंवा चप्पलमार आंदोलन आदी गोष्टी न करण्याची विनंती केली आहे. कार्यकर्त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण तसे करताना शब्द जपून वापरावेत, असे छगन भुजबळ म्हणालेत.