मुंबई-गोवा महामार्गाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
- गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मंत्रालय टाइम्स, रायगड – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, रवींद्र पाटील, विभागीय आयुक्त पी.वेलरासू, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्री.घोटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, रूपाली पाटील, प्रांताधिकारी राहुल मुंडके, प्रवीण पवार, ज्ञानेश्वर खुटवळ, इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पनवेल पळस्पे येथून या मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. पहिली टेक्नॉलॉजी एम ६० आरएफसी आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम ६० पद्धत आणि तिसरी डीएलसी पद्धत या तीन आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट एम ६० या पद्धतीचाही उपयोग करण्यात येत आहे. या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे.या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे.
ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पद्धतीने कुठे काम करायचे, हे आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरू आहे.
जरी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले.
या तब्बल १५५ किलोमीटर रस्त्याच्या पाहणीदरम्यान त्यांनी पळस्पे, गडब, कोलाड, माणगाव, लोणेरे फाटा आणि कशेडी बोगदा या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची भर पावसात पाहणी केली.शेवटी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी या महामार्गावरील रस्त्यांची राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी निर्देश दिले.
या पाहणी दरम्यान रायगड प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांना मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याविषयीचे निवेदन दिले.