बीड

धनंजय मुंडेंची शिफारस वादात, वाल्मिक कराड ‘लाडकी बहीण’चा अध्यक्ष

 

केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती उघड होत आहे. या प्रकरणाशी कथित संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याच्याबद्दल दररोज नवे खुलासे होत आहेत.

वाल्मिक कराड हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर तो परळी समितीच्या पदावर अजूनही कायम आहे.

वाल्मिक कराड याच्यावर १४ गुन्हे असतानाही तो अध्यक्षपदी आहे. वाल्मिक कराड याची शिफारस मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांची शिफारस वादात अडकली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो. वाल्मिक कराड याच्यावर गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर घेतलेच कसे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

वाल्मिक कराडवर खंडीसह 14 गुन्हे दाखल आहेत. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी अजूनही कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. कराडवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असतानाही लाडकी बहीण योजनेच्या समितीमध्ये स्थान कसे मिळाले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे अगोदरच या प्रकरणामुळे टार्गेट होत आहेत. अशात या नवीन खुलाशामुळे मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींची सध्या सीआयडी, एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येत आहे. वाल्मिक कराड याला खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. कराडने यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का? किंवा असे गुन्हे करण्यात त्याने कुणाला साथ दिली का? याचा तपास केला जात आहे. वाल्मिक कराड याच्यावर धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. त्यातच आता लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी वाल्मिक कराड असल्याचे समोर आल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीचे कार्यालय आहे. येथीलच एका अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात वाल्मीक कराड याच्यासह विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. याचा तपास सीआयडी पथक करीत आहे. कराड हा पुण्यात शरण आला होता, तर चाटे याला बीड शहराजवळ पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सध्या दोघेही पोलिस कोठडीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!