पुण्यात तब्बल 138 कोटींचे सोने जप्त : आचारसंहिता काळात पोलिसांची कारवाई; जप्त सोने एका कंपनीचा वैध माल असल्याचा दावा
मंत्रालय टाइम्स | राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आचारसंहिता सुरू असल्याने पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. पुण्यातील सहकारनगर परिसरात शुक्रवारी सकाळी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका टेम्पोतून तब्बल 138 कोटी रुपयांचे सोने जप्त केले.
आचारसंहिता काळात पोलिसांनी नाकेबंदीत पकडलेल्या या सोन्याची माहिती निवडणूक अधिकारी व आयकर विभागालाही दिली. त्यानंतर जप्त करण्यात आलेले सोने पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. पाेलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, सहकारनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरु असताना, मुंबईच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाचा टेम्पाे एमएच 02 ईआर 8112 हा पुण्यात आला होता. सिक्वेअल कंपनीचा सदर टेम्पाे सहकारनगर परिसरातून जात असताना पाेलिस पथकाने त्याला थांबवून त्याची तपासणी केली. त्यात टेम्पोत पांढऱ्या पोत्यांत बॉक्स ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी संशयावरून त्याची पाहणी केली असता त्यात 138 किलाे साेने असल्याचे दिसून आले. सदर सोने हे मुंबईतील एका साेने डिलीव्हरी करणाऱ्या कंपनीचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याबाबतची कागदाेपत्री तपासणी आयकर विभाग करत आहे.
कारमधून 5 कोटींची रोख रक्कम जप्त उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्याच्याच खेड – शिवापूर परिसरात सोमवारी रात्री एका कारमधून तब्बल 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या घटनेमुळे अवघे राजकारण ढवळून निघाले होते. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी ही रोख रक्कम सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे असल्याचा आरोप केला होता. पण त्याची पुष्टी झाली नव्हती. रविवार पेठेतील ज्वेलर्समधून दागिने लंपास दुसरीकडे, एका चोरीच्या घटनेत खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये शिरलेल्या 2 महिलांनी सेल्समनची नजर चुकवून दुकानातील 2 लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास गोविंद हलवाई चौकातील ज्वेलर्समध्ये घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे रविवार पेठेतील गोिंवद हलवाई चौकात सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास 2 महिला खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरल्या. त्यानंतर त्यांनी सोन्याचे गंठण हातात घेऊन सेल्समनची नजर चुकवून 2 लाखांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करीत आहेत.