ब्रेकिंग | विधानसभा निवडणूक दिवाळीपूर्वीच..?
मंत्रालय टाइम्स – खास प्रतिनिधी | राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध सगळ्याच राजकीय पक्षांना लागले आहेत. राज्यातच नव्हे तर देशात महाराष्ट्राच्या विधानसभेत कोण बाजी मारते यांची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाच्या बैठकांचा जोर वाढला आहे. त्यात आचारसंहिता पुढील काही दिवसांतच लागल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. येत्या १२-१५ दिवसांत विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याने निवडणुकही वेळेत म्हणजेच ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीपूर्वी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काही नेत्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल तर काहींचे दिवाळीपूर्वीच राजकीय ‘दिवाळे’ निघेल, एवढे नक्की.
- आचारसंहिता १५ दिवसात लागणार
गेल्या वेळी म्हणजे २०१९ मध्ये, अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती आणि २१ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते, तर २४ ऑक्टोबर रोजी निकाल घोषित करण्यात आला होता. यावेळीही साधारण २५-३० सप्टेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर कदाचित निवडणूक एकाच टप्प्यात होईल, असेही समजते.
- उद्घाटनांच्या तारखांची लगबग
राज्य सरकारकडूनही प्रशासकीय पातळीवर काही महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याच्या कामाला जोर आला असून पूर्ण झालेल्या प्रकल्पाच्या उद्घाटनांच्या तारखाही निश्चित करण्याची लगबग सुरू झाली आहे. महायुतीकडून चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की महायुतीचे ७०-७५ टक्के जागावाटप निश्चित झाले आहे तर महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात यांनी २८८ पैकी १२५ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना उबाठाचे एकमत झाल्याची माहिती माध्यमांना दिली.