ब्रेकिंग | बदलीस पात्र असलेले ३९ विभागातील ‘इतके’ अधिकारी व कर्मचारी वेटिंगवर..!
मंत्रालय टाइम्स – मुंबई | राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या नियमानुसार आणि बदली अधिनियम 2005 मधील तरतुदीप्रमाणे बदली करण्यास सक्षम असलेले प्राधिकरण दरवर्षी मे महिन्याच्या अखेर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतात. मात्र यंदा झालेल्या लोकसभा निवडणुका आणि मे महिन्यात लागू असणाऱ्या आचारसंहितेमुळे राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया केल्यानंतरही बदली धोरण राबवले नाही. मात्र राज्य शासनाकडून बदली संदर्भातील नव्या आदेशाची प्रतीक्षा विभागप्रमुखांना होती. त्याप्रमाणे 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यातआली होती. त्यामुळं 31 ऑगस्टच्या आधीच म्हणजे दोन दिवसात अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या 39 विभागांतील बदलीस पात्र सुमारे 31 हजार अधिकारी व कर्मचारी वेटिंगवर आहेत. दुर्गम-अतिदुर्गम भागातील कर्मचारी कधी बदली होणार? याकडे नजरा लावून आहेत, तर ज्यांना मलाईदार जागा हव्यात अशा महसूल, कृषी, परिवहन, वनविभाग, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी मंत्रालयातील पायऱ्या झिजवत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता कोणत्या विभागातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या किती बदल्या होणार? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. पण बदल्यांसाठी फक्त दोनच दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळं या दोन दिवसात काय काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.