भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र वाचवण्यासाठी जीवन वेचतोय, त्यांच्या प्रेमाचा असाही धाक !
मंत्रालय टाइम्स - विशेष - बाळासाहेब ल. पाटील
अंगावरती साधा पांढरा शर्ट आणि पांढरी पॅंट घालून सांगलीचा एक तरुण महाराष्ट्राच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करायला चालला. समोरुन येणा-या विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी या तरुणाला बघितलं . म्हणाले, राज्याचा अर्थसंकल्प सादर करतोयस. काय रुबाब पाहिजे… अन् हे काय घालुन आला आहेस..? त्या तरुणाने राणेंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण नारायण राणे त्याचे काहीच ऐकून घेईनात. राणेंनी त्याच क्षणी फोन लावून टेलरला बोलावुन घेतलं, आणि त्या तरुणाच्या कोटाचे माप घेऊन आकर्षक महागडा कोट शिऊन घेतला. तो कोट त्याला घालायला लावुन त्या तरुणाला अर्थसंकल्प सादर करायला विधिमंडळात घेऊन गेले. तो तरुण म्हणजे दुसरं तिसरं कोणी नव्हतं तर ते होते सांगली जिल्ह्यातील कासेगांवचे सुपुत्र आणि माजी मंत्री जयंतराव राजारामबापू पाटील !
अत्यंत प्रक्षुब्ध झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मालवण मधील राजकोट किल्ल्यावरती नुकतेच माजी मंत्री जयंत पाटील यांनी समजुत घालुन शांत केलं आणि संघर्ष टाळला. त्यानंतर जयंत पाटील यांच्या विरोधकांमध्ये असणाऱ्या प्रेमळ धाकाची चर्चा सुरू झाली आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील ही सभ्यता जयंत पाटील यांना सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी त्यांनी आत्मसंयम, वाणी आणि राहणीमध्ये एकवाक्यता आणण्यासाठी अपार मेहनत केली आहे . केवळ दिवंगत लोकनेते राजारामबापू पाटील यांचा वारसदार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या वरती घोर अन्याय केल्यासारखे होईल.
वयाच्या २१ व्या वर्षी राजकारणात जयंत पाटील यांनी पाऊल टाकलं. त्यावेळी साधी ग्रामपंचायतही त्यांच्या ताब्यात नव्हती. सांगली जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानावर दादा घराण्याची दादागीरी होती. अशा शुन्यातून प्रवास करत जयंत पाटील आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरलेत. हा त्यांचा राजकीय जीवनप्रवास कौतुकास्पदच म्हणावा लागेल .
जयंत पाटील यांना राजकारणात विरोधकांच्या पेक्षा स्वपक्षीय लोकांनाच ज्यादा तोंड द्यावं लागलं आहे. आम्ही राजारामबापू यांचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आधी आमची इच्छा पुरी करा ‘असा जयंत पाटील यांच्या पाठीमागे सारखं लोकांचा लकडा असतो. त्यांचे समाधान करण्याचे कठीण काम जयंत पाटील यांनी केलं. नंतर त्यांचा राजकीय जीवनप्रवास सुखर झाला हे त्यांचे राजकारणातील वेगळेपण म्हणावे लागेल .
आज शरद पवार यांच्या वरती चौफेर हल्ले होत असताना छातीचा कोट करुन विरोधकांचे वार जयंत पाटील स्वतःच्या अंगावरती घेत आहेत. शरद पवार यांचा सर्वधर्मसमभावाचा विचार जिवंत रहावा यासाठी जयंत पाटील चांद्यापासुन बांद्यापर्यत उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत .
अजित पवार नावाचा सख्खा चुलत भाऊ सुप्रिया सुळे नावाच्या बहिणीला वा-यावरती सोडून सत्तेसाठी नको त्या लोकांच्या गळ्यात गळा घालून बदनाम होत असताना सुप्रिया सुळे यांना भक्कम समर्थन देत जयंत पाटील बहिण भावातील नात्याला एक नवीन आयाम देत आहेत. अमोल कोल्हे यांच्यासारख्या डॉक्टर असणाऱ्या नामवंत अभिनेत्याला छ. शिवरायांचे विचार महाराष्ट्राच्या मातीत पेरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे.
रात्रीचे वेशांतर करून नव्हं तर महाराष्ट्रातील जनतेचे जिव्हाळ्याचे विषय ऐरणीवर आणुन सत्तेमध्ये जाण्यासाठी जयंत पाटील दमदार वाटचाल करत आहेत . काल नारायण राणे पुढारी प्रतिनिधींना मालवणमध्ये उद्धटपणे तंबी देताना सिंधुदुर्गाचा विकास मी आणि मीच केलाय असं ऊर बडवून उर्मटपणे सांगत होते. जयंतराव पाटील यांची कामाची पध्दत राणेंच्या अगदी विरुद्ध टोकाची आहे. जयंत पाटील यांनी ज्याला कुणाला सत्तेवर बसवलं ते मी बसवला असा कधीच आत्मप्रौढीचा बाजार मांडला नाही.नारायण राणे पत्रकारांचा माईक हिसकावून घेऊन आपल्यातील हिंसकपणाचे प्रदर्शन करत होते. तर जयंत पाटील पत्रकारांच्यासोबत चहाच्या गाड्यावरती चहाचा भुरखा मारत गप्पा ठोकताना दिसतात.
निलेश राणे आणि नितेश राणे ही नारायण राणे यांची दोन मुलं उठसूठ पोलिसांच्यावरती अरेरावी करताना दिसतात. याऊलट जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील हे रस्त्यावरुन जाणारा साधा पत्रकार जरी असला तरी त्यांच्या खांद्यावरती हात टाकून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात. जयंत पाटील यांनी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांच्याशी जुळवून घेतलं तसंच माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्याशीही मैत्री निर्माण केली. सत्यजित पाटील सारख्या एका आमदाराला जयंत पाटील यांनी हातकणंगले लोकसभेच्या मैदानात उतरवुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोंडाला फेस आणला. दुष्काळी भागातील जत पर्यंत म्हैसाळ योजनेचे पाणी पोहचविताना जयंत पाटील यांनी अंगचं पाणी दाखवलं होतं.आता भाजपने निर्माण केलेली महाराष्ट्रातील अघोषित आणिबाणी संपुष्टात आणण्यासाठी हा पाणीदार नेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे ही काळाची गरज झाली आहे.
जिथं शरद पवार यांच्या बोलण्यात नकार असतो तिथं जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार राजकारणाला योग्य आकार देताहेत हे ओळखायचं . वसंतरावदादा पाटील यांच्या नंतर ब-याच वर्षाच्या कालखंडानंतर सांगली जिल्ह्याला एक खमक्या मुख्यमंत्री महाराष्ट्र वाचवण्यासाठी जीवन वेचतोय ही बाब महाराष्ट्राच्या सुजाण मतदारांनी गंभीरपणे विचार करण्यासारखी आहे!