ब्रेकिंग | कल्याणमध्ये दहीहंडीनिमित्त लावलेल्या स्वागताचं बॅनर कोसळलं..!
मंत्रालय टाइम्स – कल्याण | मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये चौका- चौकात, मोक्याच्या ठिकाणी राजकीय पक्षांकडून उंचच्या उंच दहीहंड्या लावल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते मंडळींकडून आयोजित करण्यात आलेल्या या दंहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीसांची पर्वणी गोविंदांसाठी आहे. त्यामुळे त्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळत आहे.
राज्यात आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. गोविंदा पथकांमधील हा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कुठे गोविंदाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे तर कुठे आयोजकांनी गोविंदांच्या सुरक्षेकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या गोविंदा पथकांचे स्वागत करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून, आयोजकांकडून स्वागत करणाऱ्या कमानी लावल्याचे पाहायला मिळते अशातच कल्याणच्या चक्की नाका परिसरात दहीहंडीनिमित्त लावलेल्या स्वागत कमानीचा भाग कोसळल्याचे समोर आले आहे.
दहीहंडी निमित्त स्वागत करणारे बॅनर कल्याण येथील चक्की नाका परिसरात लावण्यात आले होते. मात्र आज या स्वागत कमानीचा काही भाग कोसळला आहे. मात्र सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही व्यक्तीला इजा किंवा गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक, उपशहर प्रमुख विशाल विष्णू पावशे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सव परिसरात ही घटना घडली आहे.