ब्रेकिंग | धक्कादायक खुलासा; शाळेतील १५ दिवसांचं सीसीटीव्ही फूटेज गायब, मुख्याध्यापिकाही फरार.. बदलापूर प्रकरणात घडामोड.!
बदलापूर शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब
-
Badlapur School CCTV Footage Missing: बदलापूर शाळेतील गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली.
Badlapur School Rape News: बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात असताना शाळेतील गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याची बाब सरकारच्या द्विसदस्यीय अहवालातून समोर आली. महिला सेविकांनी त्यांचे काम नीट केले नाही म्हणून त्यांनाही सहआरोपी बनवण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वैद्यकीय चाचणीला उशीर झाल्याने अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी महिला व बालकल्याण विभाग आणि शिक्षण मंत्रालयाने तयार केलेला अहवाल सोमवारी शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर शाळेतून गेल्या १५ दिवसांचे फुटेज गायब आहेत. हे फुटेज गायब का झाले आणि त्यामागचा हेतू काय आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे, असे केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सीसीटीव्ही गायब झाल्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- तक्रारीसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू होणार
महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना हाताळण्यासाठी राज्यातील शाळेत स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाकडून दररोज अशा घटनांचा अहवाल मागवला जाणार आहे. शाळेतील मुलींना तक्रारीसाठी या कक्षासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली जाईल, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
- मुख्याध्यापिका फरार, आरोपी म्हणून जाहीर
शाळा व्यवस्थापनाकडून घटना लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा गंभीर घटनेत शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन मंडळ उदासीन असल्याचे आढळून आले. याशिवाय, शाळेतील मुलांच्या पालकांना परस्पर शांत करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. बदलापूर शाळेतील निलंबित मुख्यधापिकेला पोलिसांनी फरार आरोपी म्हणून जाहीर केले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे न लावल्याबद्दल महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे सरकार असा निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, असा कडक संदेश जाईल, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.