मोठी बातमी | बुलढाणा पोलिसांचा ‘बुरखा’ आ. संजय गायकवाड यांनी विधानसभेत ‘टराटरा’ फाडला!
– जिल्ह्यात पोलिस व गुन्हेगारांचा हातात हात;
- अवैध धंदे, गांजातस्करी, चोर्यांना उधाण!
- – तरूणही नशेत बेधुंद असल्याने गुन्हेगारीही बोकाळली;
- वरलीमटक्याचे अड्डे पोलिसांच्या डोळ्यासमोर सुरू!
नागपूर (खास प्रतिनिधी ) – बुलढाणा जिल्ह्यात सहा महिन्यात तीन जातीय दंगली झाल्या असून, चोर्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. तर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले असून, गांजातस्करीही वाढली आहे, यामुळे युवक नशेत बेधुंद होत असल्याने गुन्हेगारी वाढल्याचे दिसत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या समोरच हे होत असूनही ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कामी आता शासनानेच लक्ष घालावे, अशी मागणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज, दि. १८ डिसेंबररोजी विधिमंडळ अधिवेशनात लावून धरली. आ. गायकवाड यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बुलढाणा पोलिसांच्या नाकर्तेपणाचा व गुन्हेगारांना आश्रय देण्याचा बुरखा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व भरसभागृहात टराटरा फाडल्या गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन गेल्या दि. १६ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू आहे. आमदार संजय गायकवाड यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत बुलढाणा पोलिसांच्या नाकर्तेपणाचा पाढाच सभागृहापुढे वाचला. ते म्हणाले, की बुलढाणा जिल्ह्यात गेल्या महिन्यात तीन जातीय दंगली झाल्या आहेत. शिवाय, घरफोड्यांचे प्रमाणही वाढले असून, एका आमदाराचे तीन वर्षांपूर्वी घर फोडले. परंतु त्या आरोपींचा सुगावा अद्यापही पोलिसांना लागला नाही. जिल्ह्यात अवैध दारूविक्री, गावठी दारू, चक्रीसह अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत. मध्य प्रदेशातून सर्रास गुटखा जिल्ह्यात येतो. शिवाय, ट्राफिक पोलिसांमुळे मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत. वरली-मटक्याचे अड्डे तर पोलिसांसमोर सुरू आहेत. हे सर्व सर्रासपणे चालू असताना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
गांजाचे प्रमाण वाढल्याने विशेषतः तरूण याकडे याकडे ओढला जात असून, बेधुंद अवस्थेत होऊन तो गुन्हेगारीकडे वळल्याने जिल्ह्यात सहाजिक गुन्हेगारीही वाढली आहे. जिल्ह्याचा पोलिस विभाग हे थांबविण्यास असमर्थ असल्याने आता शासनानेच याला आळा घालण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी केली.
आ.गायकवाड यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बुलढाणा पोलिसांचा निष्क्रियपणा भरसभागृहात चव्हाट्यावर तर आलाच, पण जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नाकर्तेपणावरही आ. गायकवाड यांनी बोट ठेवून पोलिस व गुन्हेगारांचे साटेलोटे चव्हाट्यावर आणले.
- – खालील मुद्देही आ. गायकवाड यांनी केले उपस्थित –
शेतकर्यांसाठी सुजलाम-सुफलाम जीवन घडवणार्या नदीजोड प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण व्हावीत अशी मागणी केली.
– ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची तफावत दूर करण्यासाठी सीबीएससी पॅटर्नच्या शिक्षणाची व्यवस्था गावखेड्यांपासून झोपडपट्टी भागांपर्यंत राबवावी.
– एमआयडीसीसाठी ५०० एकर जमीन संपादनाचे काम तातडीने पूर्ण करून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला.
– मलकापूर-बर्हाणपूर-चिखली लोहमार्ग तयार करून बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण व उत्तर भारताशी थेट संपर्क वाढवण्याची मागणी केली.
– सोयाबीन शेतकर्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
– बुलढाणा शहरातील महापुरुषांच्या स्मारकांचे सौंदर्यीकरण आणि विकासासाठी मंजूर निधीबद्दल शासनाचे आभार मानले.