महाराष्ट्रात २४ तासांत खातेवाटप.? भाजपला गृह, राष्ट्रवादीला अर्थ तर शिवसेनेला शहर विकास अन् सार्वजनिक बांधकाम मिळण्याची शक्यता..!
- खास प्रतिनिधी | मंत्रालय टाइम्स | मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारचे खातेवाटप पुढील 24 तासांत होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य खातेवाटपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीनंतरही राज्याचे गृह खाते भाजपकडेच राहणार असून, शिवसेनेला शहर विकास व सार्वजनिक बांधकाम विकास मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांना त्यांचे अर्थ मंत्रालय मिळण्याची चिन्हे आहेत.
महायुती सरकारचा गत 5 डिसेंबर रोजी शपथविधी झाला. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर गत रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 व राष्ट्रवादी काँग्रेसच्या 11 मंत्र्यांचा समावेश आहे. पण त्यानंतर अद्याप मंत्र्यांचे खातेवाटप झाले नाही. यामुळे विरोधकांनी बिनखात्याच्या मंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 24 तासांत खातेवाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुणाला कोणते खाते मिळणार? देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार? याचे उत्तर पुढील 24 तासांत मिळेल. सूत्रांच्या माहितीनुसार, खातेवाटपाचा संभाव्य फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
- त्यानुसार भाजपला गृह मंत्रालयासह, विधि व न्याय, ऊर्जा, सिंचन, ग्रामविकास, महसूल, कौशल्य विकास, सामान्य प्रशासन, पर्यावरण, आदिवासी विकास आदी खाती मिळण्याची शक्यता आहे.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला शहरविकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, पर्यटन, खाणकाम, पाणीपुरवठा, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पीडब्ल्यूडी आदी खाती मिळतील असा अंदाज आहे.
- दुसरीकडे, अन्य एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ व नियोजन, अन्न व पुरवठा, एफडीए, उत्पादन शुल्क, कृषी, महिला व बालविकास, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक, मदत व पुनर्वसन आदी खाती मिळू शकतात.