महायुतीच्या ६२% मंत्र्यांवर गुन्हे, त्यात भाजपचे २० पैकी १६ :भाजपचे मंत्री शिंदेसेना, राष्ट्रवादीपेक्षा श्रीमंत, ३९ मंत्र्यांवर कर्ज
- खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स
स्पष्ट बहुमत मिळालेल्या महाविकास आघाडीच्या ४२ मंत्र्यांचा शपथविधी रविवारी नागपूरमध्ये पार पडला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकप्रतिनिधींबाबत निवडणुकीत कायम चर्चा होत असली तरी आता मंत्रिमंडळामध्येही अशांना स्थान देण्यात आले आहे. महायुती सरकारमध्ये ४२ पैकी तब्बल २६ मंत्र्यांवर (बासष्ट टक्के) गुन्हे दाखल आहेत. तर १७ मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या सर्व मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले त्यामधून ही माहिती समोर आली आहे.
या विश्लेषणानुसार, २६ (६२ टक्के) मंत्र्यांनी स्वत:वर फौजदारी खटले जाहीर केले आहेत आणि १७ (४० टक्के) मंत्र्यांनी स्वत:वर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये ४०, तर मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच स्थान मिळालेल्या कणकवली विधानसभेतून निवडून आलेले आमदार नितेश राणे यांच्यावर तब्बल ३८ केसेस दाखल आहेत. राणे यांच्यावर महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचाही समावेश आहे. त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ४, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ९ गुन्हे दाखल आहेत.
- भाजपच्या सर्वाधिक १६ मंत्र्यांवर गुन्ह्यांची आहे नोंद
गुन्हे दाखल असलेल्या मंत्र्यांमध्ये सर्वाधिक १६ मंत्री हे भाजप पक्षातील आहेत. त्याखालोखाल ६ जण हे शिवसेना आणि ४ जण हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आहेत. गंभीर स्वरूपातील गुन्ह्यांमध्येही सर्वाधिक १० मंत्री हे भाजपचे आहेत, तर राष्ट्रवादीचे ४ व शिवसेनेच्या ३ मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे आणि जयकुमार गोरे यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल असल्याचे अहवालात म्हटले आहे.
- भाजपचे मंत्री शिंदेसेना, राष्ट्रवादीपेक्षा श्रीमंत, ३९ मंत्र्यांवर कर्ज
शपथ घेतलेले सर्वच ४२ मंत्री हे कोट्यधीश आहेत. यानुसार भाजपच्या सर्व २० मंत्र्यांची सरासरी संपत्ती ही ५५ कोटी, शिवसेनेच्या मंत्र्यांची ४६ कोटी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची सरासरी संपत्ती ही ४७ कोटी रुपये आहे. ४२ पैकी ३९ मंत्री हे कर्जबाजारी आहेत. यामध्ये सर्वाधिक श्रीमंत असलेल्या मंत्री मंगलप्रभात लोढांवर ३०६.२२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्या मंत्रिमंडळात म्हणजे एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्येही लोढा सर्वाधिक श्रीमंत होते. त्यांनी त्यांची श्रीमंती कायम राखली आहे.
- खातेवाटपाकडे लागले सर्व नव्या मंत्र्यांचे लक्ष
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या घटकपक्षांना विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले होते. यानंतर मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याविषयीच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. आता येत्या काही दिवसांतच खातेवाटप पूर्ण करण्यात येणार आहे.
1. शिंदेसेनेच्या १२ पैकी ६, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या १० पैकी ४ मंत्र्यांवर गुन्हे दाखल
2. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सर्वाधिक ४०, तर भाजपच्या नितेश राणे यांच्यावर ३८ गुन्हे
3. गंभीर गुन्हे १७ मंत्र्यांवर, खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात भाजपचे तीन मंत्री