मोठी बातमी! आमदारांनंतर आता मंत्रालयाच्या इमारतीवरून धनगर आंदोलकांच्या उड्या
मंत्रालय टाइम्स – खास प्रतिनिधी | राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विधानसभा निवडणुकीआधीच धनगर आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे. धनगर आंदोलकांची आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी आहे.
या मागणीसाठी धनगर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत थेट मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्याची घटना घडली आहे. आंदोलकांनी उड्या मारल्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली.
काही दिवसांपूर्वी आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या होत्या. यामध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचाही समावेश होता. या आदिवासी आमदारांचा धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून देण्यास विरोध आहे. आरक्षणाच्या मुद्द्यासहित विविध मागण्यासाठी आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या होत्या. त्यानंतर आता धनगर समाजाच्या आंदोलकांनी मंत्रालयातील तिसऱ्या माळ्यावरून संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्याची घटना समोर आली आहे.
आदिवासी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत धनगर आंदोलकांनी संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या आहेत. धनगर आंदोलकांनी जाळ्यावर उड्या मारल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले. त्यानंतर काही आंदोकांनी मंत्रालयाच्या आवारात घोषणाबाजी केली.