अखेर १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; निवडणूक आयोगाने कानउघाडणी केल्यानंतर जाग.
मंत्रालय टाइम्स – (खास प्रतिनिधी )मुंबईतून अखेर १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने बदल्यांचे आदेश दिले होते. एका पदावर तीन वर्ष पूर्ण झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश होते.मात्र, यावर पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.
३१ जुलैला दिलेल्या आदेशाचा अनुपालन अहवाल २० ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश होते. तरी देखील बदल्या करण्यात आल्या नव्हत्या. मुंबईतील १३० पोलीस अधिकाऱ्यांची मध्यावधीत बदली करण्यास गृह खात्याने असमर्थता दर्शवली होती. मध्यावधी बदलीचा पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची होती गृह खात्याने वर्तवली होती.
मात्र वेळेत बदल्या न केल्याने निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालकांची कानउघाडणी केली होती. राज्याच्या मुख्य सचिवांसह पोलीस महासंचालकांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर याप्रकरणी पोलीस महासंचालकांनी कार्यवाही केली आहे. पोलीस महासंचालकांनी १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी घेतलेल्या या निर्णयाला महत्त्व आहे.