मुंबई शहर

ब्रेकिंग | मोठ्या प्रमाणावर होणार बदल्या ? आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार

मंत्रालय टाइम्स – (खास प्रतिनिधी) राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी तीन वर्ष सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांच्या तसेच स्वतःच्या गृह जिल्ह्यात असलेल्या अधिकाऱ्यांच्या दोन दिवसांत बदल्या करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर राज्य सरकारने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात केली आहे.

मात्र, मुंबईत असलेल्या १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्यास गृहविभागाने असमर्थता दर्शवली असून, तसे पत्र आयोगाला दिल्याचे सूत्रांनी ‘मंत्रालय टाइम्स’ला सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून तसे प्रमाणपत्र मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांमार्फत निवडणूक आयोगाला द्यावे लागते. ऑगस्टमध्ये आयोगाने अशा बदल्यांचे निर्देश देऊनही सरकारने बदल्या केल्या नव्हत्या. शेवटी मुंबईत दौऱ्यावर आलेल्या आयोगाने रविवारी दोन दिवसांत या बदल्या करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. त्यानुसार सरकारने सोमवारपासून बदल्यांना सुरुवात केली. मंगळवारी राज्यातील १२ उपअधीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

मोठ्या प्रमाणात होणार बदल्या..!

नायब तहसीलदारपर्यंतच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार ‘महसूल’ने विभागीय आयुक्तांना दिले आहेत, तर विविध विभागातील बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. येत्या एक-दोन दिवसांत राज्यात प्रशासन व पोलिस दलात मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळतील.

  • नकार कशासाठी…?
  • मुंबईतील बदली पात्र १३० पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्याबाबत गृहविभागाने नकार दिला असून, तसे आयोगाला कळविल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • मुंबईत उपनगर आणि शहर असे दोन जिल्हे आहेत; मात्र निवडणूक आयोगाकडून हा एकच जिल्हा गृहीत धरला जातो. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या मुंबईबाहेर नवीन जागी बदल्या केल्या तर मुलांच्या शाळेचा आणि निवासाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
  • तसेच या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांच्या जागी दुसरे अधिकारी नियुक्त केले तर त्यांनाही ही अडचण येणार आहे. त्यामुळे आम्ही या बदल्या करू शकत नाही, असे गृहविभागाने कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!