मोठी बातमी | गृहमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची नासधूस
मंत्रालय टाइम्स (खास प्रतिनिधी) –संपूर्ण राज्याच्या प्रशासनाचे मुख्यालय; आमदार, खासदार आणि अनेक ‘व्हीव्हीआयपीं’चा मंत्रालयात कायम राबता असतो. त्यापार्श्वभूमीवर मंत्रालयात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
तरीही, आंदोलने आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न; असे प्रकार मंत्रालयात होत असतात. आता मात्र उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची नासधूस केल्याचं समोर आलं आहे. ही घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्रानं हे वृत्त दिलं आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं मंत्रालयातील कार्यालयाची एका महिलेने नासधूस केली आहे. कडेकोट बंदोबस्त असताना आणि तेही थेट गृहमंत्री फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची नासधूस करण्याची हिंमत कुणाची? असे बोललं जात आहे. यामुळे गृहमंत्री फडणवीस यांचेच कार्यालय सुरक्षित नसल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, या घटनेनंतर मंत्रालयातील सुरक्षतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांचं कार्यालय आहे. गुरूवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्यानं मंत्रालयात वर्दळ कमी होती. कर्मचारी वर्गाची उपस्थितीही फारशी नव्हती. पावसामुळे कर्मचारी आणि अधिकारी घर गाठण्याच्या तयारी असताना 6.30 वाजेच्या सुमारास एक महिला फडणवीस यांच्या कार्यालयात घुसली आणि आरडाओरडा करायला सुरूवात केली.
कर्मचाऱ्यांनी विचारपूस करेपर्यंत महिलेने तेथील झाडांच्या कुंड्या फेकून दिल्या. दालनाबाहेर असलेली फडणवीस यांच्या नावाची पाटीही काढून फेकून दिली. पोलिस येईपर्यंत त्या अज्ञात महिलेने पोबारा केला. परंतु, रात्री उशिरापर्यंत ही महिला कोण होती, हे समजू शकले नाही. मंत्रालय सुरक्षा तिचा शोध घेत आहे.
या घटनेनंतर मंत्रालयातील सुरक्षेवर शंका उपस्थित होत आहे. तसेच, फडणवीस यांच्या कार्यालयाची नासधूस होत असताना पोलिस कुठे होते? महिला कुणाच्या शिफारसीवर मंत्रालयात आली? तिला पास कुणी दिला? आणि फडणवीस यांचे कार्यालयात नासधूस करण्यामागचा हेतू काय? तोडफोडीनंतर महिला पसार कशी झाली? मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेचे लक्ष नव्हते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.