ब्रेकिंग | शिंदे गट, अजित पवारांना सोबत घेऊनच लढा; नड्डांचा राज्यातील भाजप नेत्यांना कानमंत्र; सागर बंगल्यावर काय झाली चर्चा.. वाचा सविस्तर..!
मंत्रालय टाइम्स – खास प्रतिनिधी | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांची बैठक घेत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला आहे.
जे.पी. नड्डा यांनी आज भाजपच्या नेत्यांची बैठक घेतली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीची इनसाईड बातमी आता साम टीव्हीच्या हाती लागलीय. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊनच विधानसभा निवडणूक लढवायची, असा कानमंत्र जे.पी. नड्डा यांनी भाजप नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- सागर बंगल्यावरील बैठकीत काय झाली चर्चा?
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील उपस्थित होते.
यावेळी नड्डा यांनी महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप नेत्यांना कानमंत्र दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. शिवसेना व राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणूक लढा, तसेच भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्या, असंही ते या बैठकीत म्हणाल्याचं सूत्रांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घ्या, अशा सूचनाही भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे.
- भाजपचा विधानसभेसाठी अॅक्शन प्लॅन
दरम्यान, लोकसभेतून धडा घेतल्यानंतर आता भाजपाने विधानसभेसाठी अॅक्शन प्लॅन आखला आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाहांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. तर आज जे. पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, तर महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे विशेष जबाबदारी दिलीय, भुपेंद्र यादव हे आठवड्यातील 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत, यात पक्ष, पक्ष संघटनेची जबाबदारी भुपेंद्र यादव यांच्यावर असणार आहेत.