मंत्रालय टाइम्स – मुंबई / सांगली | राज्यात दिवाळीआधी किंवा दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. सद्य परिस्थिती पाहता नक्की कोणाला यश मिळणार हे सांगता येणे कठीण आहे. निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे.
राज्यात आपली सत्ता यावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान मविआ आणि महायुतीतील सहभागी पक्ष देखील स्वतंत्रपणे किती जागा जिंकू शकतो किंवा कोणाला सत्ता मिळू शकते याचा अंतर्गत सर्व्हे करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची भेट घेतली आहे.
कागलची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट होताच भाजपच्या समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी भाजपचा बडा नेता आपल्याकडे वळवल्यानंतर भाजपने देखील त्याच प्रकारची खेळी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी सांगलीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली आहे.
आज सांगली जिल्ह्यातील शिराळा इथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुका व इतर स्थानिक विषयांवर यावेळी चर्चा केली. उत्साहपूर्ण वातावरणात घडलेला हा संवाद राज्यातील राजकारणाची दिशा सांगून गेला!! pic.twitter.com/btjGl9YCh1
— Vinod Tawde (@TawdeVinod) August 28, 2024
विनोद तावडे यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या शिराळ्यातील घरी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत राजकीय खलबतं झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप कागलचा वचपा काढणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. काही वर्षांपूर्वी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता.
दरम्यान, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी शिवाजीराव नाईक यांची भेट घेतल्याने सांगलीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवाजीराव नाईक हे भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना? अशी चर्चा होत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. समरजित घाटगे हे शरद पवार गटात जाणार आहे. तर इंदापूरचे जागा देखील अजित पवार यांच्याकडे गेल्यास हर्षवर्धन पाटील देखील काही वेगळा मार्ग निवडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.